कोरोनाच्या अनुषंगाने केन्द्रीय चमूने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती

454

पुणे प्रतिनिधी,

▪️कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये,यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा.

▪️सर्व विभागाने समन्‍वयाने काम करावे.

▪️धान्याचे वितरण सुव्यवस्थितपणे व्हावे.

▪️कोरोनाविषयी जागरूक राहा,पण भीती बाळगू नका,असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करा.

वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केन्द्रीय स्तरावरील टिम आज पुण्यात आली. या टिमने कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाण या अनुषंगाने माहिती जाणून घेतली.

या चमूतील केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सह सल्लागार डॉ. पवनकुमार सिंग,अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग,आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे उपसचिव डॉ. आशीष गवई,आरोग्य सेवेचे अतिरिक्त महासंचालक पी.के.सेन हे उपस्थित होते.

बाधित रुग्णांच्याबाबतीत मुंबई नंतर पुण्याचा क्रमांक लागतो. या मागील वस्तुस्थिती केंद्रीय चमूने जाणून घेतली.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. विभागात पुणे शहरात प्रमाण अधिक आहे.एक तर येथील लोकसंख्या आणि झोपडपट्टीचे कारण असले तरी ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये ५५ ते ७० वयोगटातील संख्या अधिक आहे. शिवाय बहुतांशी लोकांना उच्च रक्तदाब,मधुमेह या सारखे आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असले तरी प्रशासनाने अगदी सुरूवातीपासूनच खबरदारी व दक्षता घेतली आहे. जिल्हा ,मनपा,आरोग्य व पोलिस प्रशासन हे संयुक्तपणे हातात हात घालून काम करीत आहे,असे ते म्‍हणाले.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत. विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. कांही दिवसांत परिस्थिती निश्चित नियंत्रणात येईल,असा विश्वास डॉ. म्हैसेकर यांनी माहिती देताना व्‍यक्‍त केला.

पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम् यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणि लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलिस करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. तसेच लोकांमध्ये जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपपक्रमांबद्दलही सांगितले. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आमच्या भागात उद्योग व आय.टी.कंपन्या मोठ्या प्रमाणात आहे. तथापि,कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याचे सांगितले.

पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व अपर आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शहरातील आरोग्य विषयक परिस्थितीची माहिती देताना शहरातील रुग्णालय सक्षम केले असून कांही रुग्णालयांबरोबर करार करण्यात आला आहे. भविष्यात कोरोनाच्या अनुषंगाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर आपली तयारी असावी,अशा पध्दतीने नियोजन केले आहे.परिस्थिती आव्हानात्मक असली तरी आपण त्याला निश्चितपणे तोंड देऊ,असे स्पष्ट करुन मनपातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आम्ही सुरूवातीपासूनच दक्षता घेतलेली आहे. आमच्या भागात बाधितरुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी आम्ही गाफील नाही. सातत्याने उपाययोजना व जनजागृती करीत आहोत. शिवाय खाजगी रुग्णालयांबरोबरही समन्वय साधून त्यांच्याशी करार केलेला आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ससून रुग्णालय अंतर्गात अकरा मजली इमारतीत नव्याने कोविड रुग्णालय विक्रमी वेळेत सुरू केले. आरोग्याबरोबरच अडकून असलेल्या मजूर व कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासन व विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. येत्या कांही दिवसांत कोरोनाला अटकाव करण्यात यश मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण भागाची माहिती दिली.

जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही केल्‍या जाणा-या उपाययोजनांची माहिती दिली.

शेवटी केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा म्‍हणाले, सर्व विभाग समन्‍वयाने काम करीत आहे, ही समाधानाची बाब असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच अन्‍न–धान्‍याचे वितरण व्‍यवस्थित करावे आणि नागरिकांमध्‍ये विश्‍वास निर्माण करावा, असे सांगितले.