हडपसर परिसरात एक मार्च रोटी डे उत्साहात साजरा!

475

आकाश जाधव, पुणे
फेब्रुवारी महिना म्हटले की आपल्या भारतात पाश्चात्य संस्कृतीचे पेव सुटते .आपली तरुण पिढी पूर्णपणे भारतीय संस्कृती विसर ते की काय अशी भीती वाटत चालली आहे. ही पाश्चात्त्य संस्कृती आपल्यात रुजू होऊ द्यायची नसेल तर त्यावर आजच मात करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या भावी पिढीमध्ये भारतीय संस्कृती रुजवणे हाच एकमेव उपाय आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत दानाला खूप महत्त्व आहे .आपल्याकडे अतिथीला सुद्धा देव मानले जाते .आज कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत .अनेक जणांना दोन वेळा खायला अन्न नाही .सिमेंटच्या जंगलामध्ये तर पशु ; पक्षी ;प्राणी अन्न-पाण्यावाचून तडफडत आहे आहेत. म्हणूनच दानातील सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान . या अन्नदानाची सवय आपल्या पुढील पिढीत रुजवणे गरजेचे आहे .शेतकरी वर्षभर घाम गाळून पीक काढतो व ती भाकर आपण खातो .बरेचदा आपण शिल्लक राहिलेले अन्न फेकून देत असतो. ते फेकून न देता एखाद्या गरजवंताला च्या मुखात गेले तर शेतकऱ्यांना ही आनंद होतो व त्यांना त्यांच्या कष्टाचे सार्थक झाले असे वाटते.
आपण सर्वजण इतर दिवस साजरे करत असतो .पण हडपसर मधील जवळजवळ ७० कलाकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन एक अभिनव उपक्रम साजरा केला. तो उपक्रम म्हणजे रोटी डे . दर वर्षी एक मार्च रोजी हे सर्व कार्यकर्ते हा उपक्रम साजरा करत असतात .यावर्षीही सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या घराच्या आसपासच्या भागातून ताजी चपाती व सुकी भाजी गोळा करून सावता माळी मंदिर हडपसर येथे हे सर्व एकत्र गोळा केले .तेथे वेगवेगळे गट करून सर्वांनी हडपसर पासून ते पुणे स्टेशन पर्यंतच्या भागात जेवढे गरजू आहेत अशा जवळजवळ २५०० लोकांपर्यंत अन्न पोचवण्याचे काम केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे सर्व कार्यकर्ते अन्नदानाचे काम करत होते .सामूहिक नेतृत्व हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे .उड्डाणपूल ;सिग्नल ;वृद्धाश्रम ;आश्रम शाळा व फुटपाथवरील लोकांना अन्नदान करण्याचे काम या सर्व कार्यकर्त्यांनी केले.
आपल्याकडून काही तरी चांगले पुण्याचे काम झाले या भावनेने सर्व कार्यकर्ते उत्साहाने काम करत होते. व गरजू लोकांना अन्न मिळाल्या नंतर त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचाही आनंद ओसंडून वाहत होता.