कोंढवा प्रतिनिधी:
पिसोळी हा भाग ग्रामपंचायत हद्दीत येत होता पण आता २३ गावे पालिकेने आपल्या हद्दीत घेतली असून त्यामध्ये पिसोळी हे गाव सुद्धा येत आहे. या गावातील पाणी प्रश्न अत्यंत जटिल बनला असून येथे नागरिकांना कोंढवा तसेच इतर परिसरातील स्मशानभूमीतून पाणी आणावे लागत आहे , जर आठ दिवसात येथील पाणी प्रश्न पालिकेने तसेच जिल्हापरिषदेच्या माध्यमातून सोडवला नाहीतर पिसोळी ग्रामस्थ येथील ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा पद्मावती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आबासाहेब मासाळ आणि ग्रामस्थानी दिला आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे आता पालिकेचा विस्तार देखील मोठा झाला आहे. पूर्वी ग्रामपंचायत हद्दीत असलेली गावे पालिका आपल्या हद्दीत घेत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळतात. पण पिसोळी हे गाव पुणे शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेतरी येथील पाण्याचा प्रश्न अजूनही सुटला नाही. वाढत्या हवामानातील बदलामुळे आणि तीव्र उन्हामुळे गावातील विहिरी आटल्या आहेत, त्यामुळे ग्रामस्थाना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर काही नागरिकांना कोणी पाणी देता का पाणी अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पालिकेने तात्पुरते गावांतील विहिरींमध्ये टँकर द्वारे पाण्याची सोय करावी व नागरिकांची अडचण दूर करावी. पिसोळी गावासाठी पालिकेने त्वरित पाण्याच्या पाइपलाइनचे काम आठ दिवसात सुरु करून गावातील नागरिकांची तहान भागवावी अन्यथा मोठे जनआंदोलन करून प्रसंगी आमरण उपोषण करू असा इशारा जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी दिला आहे. या कोरोना महामारीच्या काळात पिसोळी ग्रामस्थ शासनाचे सर्व नियमी पाळत आहेत. पण गावातील मुख्य समस्यां पाणी प्रश्न असून हा प्रश्न पालिकेने न सोडविल्यास आम्ही येथील ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा आबासाहेब मासाळ यांनी दिला आहे. पिसोळी गावात पाण्याचा प्रश्न मोठा असून येथील नागरिक आसपासच्या गावांमध्ये असलेल्या स्मशानभूमीध्ये पालिकेच्या वतीने असलेल्या पाण्याच्या पाईप मधून पाणी आणण्याची वेळ येत असल्यामुळे पालिकेने त्वरित येथील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी राजेंद्र भिंताडे यांनी केली आहे. याप्रसंगी आबासाहेब मासाळ ,देवराम धावडे ,राजेंद्र भिंताडे , रामदास मासाळ, देवानंद मासाळ , दिलीप काळभोर, राजेंद्र मासाळ , संदीप कदम,हनुमंत मासाळ, सुरेश येप्रे, सोमनाथ मासाळ, मंगेश मासाळ,राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.