पुणे प्रतिनिधी
राज्यातील सर्वच पत्रकार आपला जीव धोक्यात घालून आपले बातम्या देण्याचे काम अविरत करत असून त्यांच्यामुळेच लॉकडाऊन मुळे नागरिक घरामध्ये बसलेले असताना अधिकृत माहिती मिळत आहे. आज महाराष्ट्र राज्यातील जवळपास ५२ पत्रकारांना कोरोनाने आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे शासनाने सरसकट सर्वच पत्रकारांना “‘फ्रंटलाइन कोविड वॉरियर्स’ म्हणून घोषित” करण्याची मागणी जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी शासनाकडे केली आहे.
पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. ते आपला जीव धोक्यात घालून आपले वार्तांकनाचे काम करत आहेत. त्यांच्यामुळेच सर्व सामान्य जनतेला आज टीव्ही, ऑनलाईन तसेच प्रिंट मीडियामुळे कोरोना बाबतची तसेच इतर खरी व अधिकृत माहिती वाचायला , पहायला मिळत आहे. त्यांच्यामुळेच नागरिकांना घरी बसल्या सर्व माहिती मिळत आहे. परंतु ह्या माहिती देण्याच्या नादात त्यांना कोरोना महामारीच्या काळात आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. अशावेळी आजार बळावण्याची जास्त शक्यता असून प्रसंगी जेष्ठ तसेच इतर पत्रकारांनां नाहक आपला जीव गमवावा लागला आहे.
यामुळे राज्यसरकारने पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडच्या धर्तीवर राज्यातील सरसकट सर्व पत्रकारांना ‘फ्रंटलाइन कोविड वॉरियर्स’ म्हणून घोषित करावे आणि कोरोनाने एखाद्या पत्रकाराचा मृत्यू झाल्यास ५०लाखांची मदत त्यांच्या कुटुंबियांना करण्याची मागणी देखील राजेंद्र भिंताडे यांनी केली आहे. दरम्यान भिंताडे यांच्या मागणीला पत्रकार संरक्षण समितीने पाठींबा दिल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.