बनावट ओळखपत्राच्या आधारे अभिनेत्रीचे लसीकरण

543
महाराष्ट्रात सरकारी लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असताना ठाण्यात मीरा चोप्रा नामक अभिनेत्रीला लस देण्यात आली धक्कादायक बाब म्हणजे बनावट ओळखपत्राच्या आधारे तिला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दाखवून तिचे लसीकरण करण्यात आले आहे. या प्रकारावरून ठाणे महापालिकेवर टीकेची झोड उठली असून या अभिनेत्रीच्या लसीकरणावर सवाल उपस्थित केला जात आहे.

देशभर कोविडचा थैमान सुरू असताना त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोविड विरुद्धच्या या महायुद्धात विजयासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असून या लसीकरणाशी संबंधित भोंगळ कारभार राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. महाराष्ट्रात सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण हे बंद करण्यात आले आहे. तरीही मीरा चोप्रा नामक एका अभिनेत्रीला शुक्रवार, २८ मे रोजी ठाण्यातील पार्किंग प्लाझा या सरकारी लसीकरण केंद्रावर कोविड १९ ची लस देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अभिनेत्रीने आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर या लसीकरणाचे फोटो टाकले होते पण या विरोधात नेटकर्यांनी संतप्त आवाज उचलल्यानंतर तिने फोटो डिलीट केले.

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून या अभिनेत्रीला लसीकरणासाठी पात्र ठरवण्यासाठी तिच्या नावाचे एक बनावट ओळखपत्र बनवण्यात आले. पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर ती निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे बनावट ओळखपत्र बनवले गेले आणि याच ओळखपत्राच्या आधारे या अभिनेत्रीचे लसीकरण करण्यात आले.

या अभिनेत्रीचे बनावट ओळखपत्र नेमके कोणाच्या आशीर्वादाने केले गेले आणि कोणाच्या कृपेने हिला नियमबाह्य लस देण्यात आली असा सवाल ठाणेकर विचारत आहेत.

 

 

 

 

 

 

 

सौजन्य:- न्यूज डँका