प्रेमाचे अनोखे रूप दाखवणारी ‘प्रेमवारी’

917

अनिल चौधरी,पुणे :-

प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे आपुलकी, प्रेम म्हणजे जिव्हाळा, प्रेम म्हणजे त्याग… प्रेमाची अशी वेगवेगळी रूपं आपल्याला  नेहमीच अनुभवास येतात.असेच प्रेमाचे अनोखे रूप आपल्याला ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘प्रेमवारी’ चित्रपटातून पाहावयास मिळणार आहे. चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. प्रेम जरी या चित्रपटाचा मुख्य गाभा असला तरी, प्रेमाचे एक वेगळे रूप या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. राहुल आणि पूजाची कॉलेजमध्ये झालेली भेट, हळुवार फुलत जाणारं प्रेम, घरातून प्रेमाला होणारा विरोध, प्रेमात येणारे अडथळे अशी अनेक दिव्य पार करून अखेर त्यांची ही ‘प्रेमवारी’ पूर्ण होते का, हे जाणून घेण्यासाठी मात्र हा चित्रपट पाहावा लागेल. इतर प्रेमकहाण्यांपेक्षा ही कहाणी निश्चितच वेगळी आहे, त्यामुळे प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच आवडेल. ‘प्रेमवारी’च्या निमित्ताने चिन्मय बऱ्याच काळाने चित्रपटात झळकणार आहे तर मयुरी कापडणेच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवा चेहरा मिळाला आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, अभिजित चव्हाण, नम्रता पावसकर, राजेश नन्नावरे, निशा माने, प्रियांका उबाळे, विशाल खिरे यांच्याही भूमिका आहेत.  या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले असून वैशाली सामंत, श्रेया घोषाल, आदर्श शिंदे आणि सोनू निगम यांनी आपल्या मधुर आवाजाने गाण्यांना स्वरसाज चढवला आहे.  साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे. या सुंदर चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.