गिरीश भोपी, प्रतिनिधी:-
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ रोजी पुकारलेल्या आमरण उपोषणाला पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. कोयना धरणाच्या उभारणीमुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांचे आजही योग्य पुनर्वसन होऊ शकलेले नाही. त्यामुळे प्रकल्प उभारणीच्या सहा दशकानंतरही प्रकल्पबाधित कुटुंब न्याय्य हक्कासाठी शासनदरबारी उंबरठे झिजवावे लागत आहेत.कोयना धरणाच्या उभारणीसाठी १९५८ मध्ये सातारा जिल्ह्यातील विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात करण्यात आले. यावेळी विस्थापित शेतकरी कुटुंबांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आज या घटनेला सहा दशके लोटली आहेत. मात्र विस्थापित शेतकरी कुटुंबांना पर्यायी जागा मिळू शकलेली नाही. त्यामुळे नागरी सुविधांची कामे रखडली आहेत.
कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी मिळाव्यात. वसाहतींना नागरी सुविधा पुरवण्यात याव्यात. यासाठी लागणारा निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा. या निधीचा विनियोग करून जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, गटारे, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी, बसस्थानक, आरोग्य केंद्र आणि पाणीपुरवठा योजना यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात. प्रत्येक कुटुंबातील दोन व्यक्तींना शासकीय नोकरीत समावून घेण्यात यावे. या आपल्या प्रलंबित मागण्या रास्त असून मागण्या शासन दरबारी मान्य होईपर्यंत सर्वतोपरी सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा सहसचिव बबनराव पवार, जिल्हा सरचिटणीस अजिनाथ सावंत, भाऊसाहेब लबडे, कृष्णा मर्ढेकर, जिल्हा युवक अध्यक्ष शर्मेश राठोड, जिल्हा युवक उपाध्यक्ष स्वप्नील काटकर, जिल्हा युवक सरचिटणीस शशिकांत करंजुळे, प्रभाग अध्यक्ष सचिन खराडे, महेश राऊत, संकेत रुपवते, विक्रांत वरपे इत्यादी उपस्थित होते.